Nostradomus
गंगा खोऱ्यात युद्ध पेटेल
” नॉस्त्रादेमसने वर्णन केलेला जागतिक कर्तृत्वाचा भारतीय नेता आणखी काही चतुष्पदींचाही नायक असल्याचे आढळते. त्याच्या नावाबद्दल कल्पना देणारी चतुष्पदी आणि त्याचे संभाव्य नाव यांचा संदर्भ येऊन गेला आहे. शायरेन‚ शिरीन किंवा किरण असे काहीसे हे नाव असेल. त्यात आणखी भर घालणारी‚ थोडी अधिक कल्पना देणारी चतुष्पदी नॉस्त्रादेमसच्या पहिल्या शतकात ७६व्या क्रमांकावर आढळते. ही ७६वी चतुष्पदी सांगते−
“...त्याचे काहीतरी जंगली नाव असेल...
तीन देवता भगिनी नियतीकडून त्याचे नाव प्राप्त करून घेतील...
अर्थात तो फार मोठा वक्ता असेल‚
कर्तृत्व गाजवील आणि... सर्व विश्वात कीर्तिमान होईल...”
या पहिल्या ओळीत रानटी-जंगली श्वापदाचे नाव असल्याचे ध्वनित केले आहे. आपल्या भारतीय परंपरेत कोणत्याही नावाला उपपद लावून नाव देण्याची प्रथा आहे. उदाहरणार्थ − कुमारसिंह‚ रणजितसिंह‚ सत्पालसिंह वगैरे. त्यामुळे हे नाव काहीतरी क्रिशनसिंह‚ किरणसिंह अथवा तत्सम काहीतरी असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात पंजाब‚ उत्तर प्रदेश‚ राजस्थान‚ बिहार‚ ओरिसा त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातही नावामागे ‘सिंह’ हे जंगली प्राण्याचे नाव लावण्याची प्रथा आहे. फार काय महाराष्ट्रातील खानदानी परंपरा असलेल्या कुटुंबांतूनही अशी नावे आढळतात. परंतु ही शक्यता उत्तर भारताकडेच अधिक अंगुलीनिर्देश करते. या संदर्भात दुसऱ्या एका चतुष्पदीत नॉस्त्रादेमस म्हणतो‚ की हा भारतीय नेता पाच नद्यांच्या परिसरातून येईल. पूर्वांपार कल्पनेनुसार पाच नद्यांचा प्रवेश म्हणजे पंजाब आणि पंजाबात सिंग किंवा सिंह ही उपाधी नावामागे जोडला जाते. परंतु आज पंजाबातील एक-दोन नद्या पाकिस्तानात गेल्या आहेत आणि महाराष्ट्रातदेखील पाच नद्या आहेत. तेव्हा आणखी एखादा सूचक संकेत मिळाल्यावाचून त्याबाबत निश्चित काही सांगणे योग्य होणार नाही. दुसऱ्या ओळीतील तीन देवता भगिनी‚ ही कल्पना ग्रीक पुराणातील गोष्टीवर आधारलेली आहे. आपल्याकडे जशी सटवाई येऊन नवजात अर्भकाच्या ललाटावर त्याचा भाग्यलेख लिहिते‚ तशाच या तीन देवता नवजात अर्भकाच्या नियतीचे जाळे विणून तयार करतात. अशी ग्रीक कल्पना आहे. प्राचीन परंपरा असलेल्या युरोपियन देशांत ग्रीक पुराणातील गोष्टींचा खूपच पगडा आढळतो. नॉस्त्रादेमसच्या कल्पनेनुसार या तीन भगिनी त्याचे नाव आणि आयुष्यभराचे कर्तृत्व याचा संपूर्ण भाग्यलेख तयार करतील. तिसऱ्या आणि चौथ्या ओळीचा अर्थ स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही. मध्यपूर्वेत पराभूत होऊन माघार घेणारे अरब अतिरेकी आणि चिनी सैन्य माघार घेऊन मायदेशी परतण्याचा प्रयत्न करील‚ हा संदर्भ येऊन गेला आहे. युद्ध आता शेवटच्या कक्षेत येऊन पोहोचलेले असेल. चिनी सैन्य मध्यपूर्वेतून अतिपूर्वेकडे स्वत:च्या देशात जाण्याचा प्रयत्न करील. मध्य आशियातील बेचिराख झालेल्या वाळवंटाऐवजी ते कदाचित भारतातून‚ ब्रह्मदेशातून प्रवास करीत मायदेशाकडे जाण्याचा यत्न करतील. भारताचा वायव्य भाग म्हणजे काश्मीर‚ पंजाब‚ राजस्थान आणि काही प्रमाणात कच्छ‚ काठेवाड‚ गुजराथ या प्रदेशांना महायुद्धाची झळ पोहोचणार आहे हा संदर्भ येऊन गेला आहे. आता हे सैन्य माघार घेत असताना भारतीय नेता त्यांचा पाठलाग करीत त्यांना अतिपूर्वेकडे पिटाळून लावील. या संदर्भात नॉस्त्रादेमसच्या चौथ्या शतकातील ५१वी चतुष्पदी सांगते−
“...पाठलागासाठी उत्सुक झालेला नेता त्यांना गाठेल त्यांची फळी फोडून आत घुसेल
पळणाऱ्यांची मार्गक्रमणा थंडावेल शेवटी ते उलटतील आणि गंगा खोऱ्यात युद्ध पेटेल”.
नॉस्त्रादेमसने चौथ्या ओळीत Ganges गंगा हाच शब्द वापरला आहे. मात्र काही पाश्चात्य समीक्षकांच्या मते गंगा म्हणजे दक्षिण फ्रान्समधील मॉन्टेपोलिअर शहराजवळचा परिसर. हे मत योग्य मानले तर पौर्वात्य अतिरेकी सेना मध्यपूर्वेतून माघार घेताना पश्चिम युरोपातील फ्रान्स या देशात माघार घेतील हा संदर्भ पटत नाही आणि गंगा ही जगातील फार मोठी नदी अस्तित्वात असताना त्या नावाचा संकेत कोणत्या तरी दुसऱ्या परिसराचा उल्लेख करण्यासाठी केला जाईल‚ असे वाटत नाही. (या तिसऱ्या महायुद्धानंतर साधारणत:) इ. स. २०२६नंतर शांती‚ समृद्धीचा कालावधी सुरू होईल. नॉस्त्रादेमसने कथन केलेल्या सात चांद्रचक्रांपैकी सातवे चांद्रचक्र इ. स. ३६४९ साली सुरू होते आणि इ. स. ३७९७ सालापर्यंत त्याचा कालावधी राहील. या शेवटच्या चांद्रचक्रात चौथे आणि शेवटचे महायुद्ध इ. स. ३७९० सालाच्या आसपास सुरू होईल आणि त्यात बहुतेक सर्व जगाचा नायनाट होईल. फारच थोडे प्राणी आणि वनस्पती वाचतील. कदाचित काही मूठभर मानवही वाचतील. परंतु मानवसंस्कृती पूर्णत: नष्ट झालेली असेल आणि या वाचलेल्या मूठभर मानवांना पुन्हा पहिल्यापासून सर्व सृष्टीचे नवनिर्माण करावे लागेल. अर्थात त्या फार दूरच्या‚ म्हणजे आजपासून सुमारे दोन हजार वर्षांनी घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्याची चिंता आपण कशासाठी करावी? □
NADKARNI,
DR. SURESHCHANDRA . NOSTRADEMASCHI
BHAVISHYAVANI (Marathi Edition) . Wings Press. Kindle Edition.
Comments